Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

तू पारिजात..भाग २

तू पारिजात.. स्वतःच्या वेळेनं उमलणारी, स्वतःच्या इच्छेनं गळणारी, आणि मी? मी तो वेडा, तुझं गळून पडणं थांबवू पाहणारा... तू म्हणायचीस, "मी फक्त रात्रीच फुलते." मी म्हणायचो, "मी पहाटेपर्यंत जागा असतो." तू खाली यायचीस, हळूच ओंजळीत पडायचीस, आणि मी वेड्यासारखा तुला धरून ठेवायचो… पण तुला माहीत होतं ना? तुझा गंध हवे सोबत जातो, मी कितीही हात बंद ठेवले, तरी तो माझ्या मुठीतुन विरतो… एक दिवस, तू पुन्हा गळून पडलीस, मी तुला उचलायला गेलो, आणि तुझा सुगंध आधीच उडून गेलेला होता… तेव्हा कळलं, तू माझी होतीस, पण क्षणभरासाठीच… आणि मी? मी तुझ्या गंधाच्या आठवणीत जन्मभर अडकलेलो...!

तू पारिजात.. भाग १

तू पारिजात.. रात्रीच फुलणारी, पहाटेच खाली पडणारी, गंधानं वेड लावणारी, आणि जरा हळवीसुद्धा… मी वारा, कधी अलगद तुला झुलवणारा, कधी वेड्या पावसासारखा तुला मिटून धरू पाहणारा, आणि कधी कधी... तुला अलगद हलवून खाली उतरवणारा. तू म्हणतेस, "गंध पुरेसा नाही का?" मी म्हणतो, "स्पर्श हवा गं...!" तू म्हणतेस, "पहाट झाली की मी नाही राहणार..." मी म्हणतो, "रात्र तरी थांबवू का?" तू पारिजात, मी वेडा वारा, तुझं फुलणं माझ्या स्पर्शावर, आणि माझं थांबणं तुझ्या सुगंधावर.

तू साधी भोळी आहेस ग..

तू साधी भोळी आहेस ग, साऱ्या जगाच्या कोलाहलात अबोध फुलासारखी खुलणारी, मृदु वाऱ्याच्या हळव्या स्पर्शात ओंजळभर स्वप्नं साठवणारी... तुला कुठे ठाऊक गं या जगाच्या वळणवाटा, इथे हसऱ्या चेहऱ्याआड दडले असतात काट्यांचे साजिरे थाट... तरीही तुझ्या डोळ्यांत मृगजळाचे मोहक गाव, त्या सावल्यांतही तुला दिसतो ऊन तलाव... तू निरागस, तू पारिजात, तू चंद्रकोरीचा मंद प्रकाश, तुझ्या हसऱ्या ओठांच्या गोड लयीला माझ्या वेदनांचे आहेत साक्ष... तू त्या रात्रीसारखी आहेस, जी स्वतःच्या चांदण्यात हरवते, तुला कधी कळणार गं? जग हे चंद्र नाही, सावल्या व्यापते... तरीही राहा अशीच, निरागस, पांढऱ्या मेघासारखी, मी कवितेत तुला जपेन, सृष्टीने जपलेल्या मंद सुरासारखी...

थांब ना थोडा वेळ..

थांब ना, थोडा वेळ अजून, संध्याकाळ अजून ओल्या रंगांनी रंगतेय, तुझ्या पावलांच्या सावल्या या रस्त्यावरून अजूनही मागे वळून पहात आहेत. थोडा वेळ बोल ना, शब्द नसले तरी तुझ्या श्वासांची भाषा कळते मला, तू गप्प असलीस तरी तुझ्या डोळ्यातून माझ्यासाठी एक संपूर्ण कविता उमलते. थांब ना, थोडा वेळ... वाऱ्याने आणलेल्या तुझ्या गंधाला अजूनही माझ्या काळजाच्या अंगणात विसावा घ्यायचाय, तुझ्या हातातली ऊब अजूनही माझ्या ओंजळीत विरघळायचीय. तू जाणार आहेस… माहिती आहे, पण थांब, क्षणभर तरी थांब, कारण हे जे काही आहे ना, ते उद्या आठवण होण्याआधी, अजून थोडा वेळ जगायचंय मला...! म्हणून, थांब ना, थोडा वेळ, थांब ना..

सावर या बटांना

सावर या बटांना, उगाच नको छळूस, हवा जरा वेडीच आहे आधीपासून, आणि तुला माहितेय ना, मी तसाच गुंततो पटकन... तू केस मागे सारतेस, आणि रात्र पुढे सरकते, क्षणभर वाटतं, संपलीच काय? पण नाही...! तू हसतेस, अन सगळं पुन्हा सुरू होते! हे बघ, तुला हसू अनावर होणार असेल, तर आधी सांग, मी डोळे झाकून बसतो, कारण त्या हसण्यात हरवायची सवय झालीये मला... आणि हे केस, असं मोकळं सोडू नकोस, तुझ्या पापण्यांआड काहीतरी चमकतंय, ते चंद्र आहे का? की मीच? सावर या बटाना, आधी हे तरी कळू दे!

शब्द वाहिले

शब्द वाहिले ओठांतुनी, जणु निघाले गंगेचे पाणी, भावविवश त्या धारा होती, मूक समर्पण एक कहाणी। मनगट थरथरुनी म्हणाले, “थांब अजुनी, ना बोल लपविले”, पण अंतःकरण दाटुनिया, ते शब्द नकळत वाहिले। नजरेतून अर्थ उभा, स्पर्शावाचून संवाद झाला, निशब्द प्रेमाचे नाते, हळुवार निखळ आविष्क झाला। शब्द नव्हते रे केवळ शब्द, ते स्पंदन होती आर्त जिवाला, त्या एका क्षणी काळ थबकला, नि अंतर्मन पूर्ण उजळला। वाहून गेले संकोच सारे, उरली एक निशब्द गुंफण, भावनांचे ते बंधन सुंदर, मुक्त हृदयी सौम्य शरण। शब्द वाहिले, पण थांबले ना; गीत ठरले जीवनगाणी, मौनामधल्या ओळींनी मग, रचली नवी प्रेमकहाणी। कितीदा तुझी आठवण आली, नि शब्द पुन्हा वाहत गेले, तुझ्या स्मृतींच्या सागराला, माझे अश्रू सामोरे गेले।