Skip to main content

थांब ना थोडा वेळ..

थांब ना, थोडा वेळ अजून,

संध्याकाळ अजून ओल्या रंगांनी रंगतेय,

तुझ्या पावलांच्या सावल्या या रस्त्यावरून

अजूनही मागे वळून पहात आहेत.


थोडा वेळ बोल ना,

शब्द नसले तरी तुझ्या श्वासांची भाषा कळते मला,

तू गप्प असलीस तरी तुझ्या डोळ्यातून

माझ्यासाठी एक संपूर्ण कविता उमलते.


थांब ना, थोडा वेळ...

वाऱ्याने आणलेल्या तुझ्या गंधाला

अजूनही माझ्या काळजाच्या अंगणात विसावा घ्यायचाय,

तुझ्या हातातली ऊब अजूनही

माझ्या ओंजळीत विरघळायचीय.


तू जाणार आहेस… माहिती आहे,

पण थांब, क्षणभर तरी थांब,

कारण हे जे काही आहे ना,

ते उद्या आठवण होण्याआधी, अजून थोडा वेळ जगायचंय मला...!

म्हणून, थांब ना, थोडा वेळ, थांब ना..

Comments