Skip to main content

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..

     मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.

     सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची.

भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो..

"आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्।

तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥"

(गीता – अध्याय २, श्लोक ७०)

अर्थ असा — जसा समुद्र नद्यांना सामावतो, पण त्याने भरत नाही, तसा तो माणूसच खऱ्या शांतीला प्राप्त होतो, ज्याच्याकडे सर्व इच्छा येतात, पण ज्याने त्या इच्छांशी एकरूप होणं सोडलंय. हाच तो बिंदू जिथं शांतता आणि शून्यता एकत्र येतात म्हणजे शांतीचा शून्यबिंदू.

         हा बिंदू कुठल्याही भौगोलिक जागेवर नसतो. तो तुमच्या आत, त्या खोल जागी असतो, जिथे विचार संपतात. ही जागा ना शब्दांनी गाठता येते, ना समजुतीने. ही फक्त अनुभवता येते, साक्षी होऊन. शांती म्हणजे डोळे मिटणं नव्हे, ती म्हणजे आत उघडणाऱ्या डोळ्यांनी पाहिलेली निर्विकारता.

    माझ्या स्वतःच्या विचारांनीही कधी-कधी मला प्रश्न विचारले: "मी इतक्या ताणाच्या, अपेक्षांच्या जाळ्यात शांती कशी शोधतो?" आणि उत्तर हळूच मनात येतं, "शांती शोधून सापडत नाही, ती शोध गाळून सापडते." जेव्हा मी स्वतःपासून थोडा थोडा हरतो, तेव्हा ती हळूच जवळ येते. काहीच न मागणारी, काहीच न सांगणारी,केवळ असणारी.

शेवटी, हीच ती जागा जिथे मी ‘मी’ राहात नाही. इथे ना प्रेम आहे, ना द्वेष, ना सुख, ना दुःख. इथे फक्त,मौन आहे.

मौन जे बोलत नाही, पण समजतं.

मौन जे वाटत नाही, पण आत खोल भासतं.

मौन जे शब्दांसारखं नसलं, तरी कविता वाटतं...........

Comments

Popular posts from this blog

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?

....

       तुझ्या निरागस हसण्यात मी भान हरपून बसतो,  तुझ्या पाऊलखुणात मी  हळवीशी वाट शोधत असतो. तुझा शब्द छोटा का होईना,  माझ्या हृदयात घर करून असतो,  प्रयत्न का होईना, पण तुझे इवलेसे मन जपत असतो. निशब्द असलो तरी, तुझ्या अखंड बडबडीत शब्द सुचवत असतो,  अबोल भावना का होईना, तुझ्या शब्दात जाणवत असतो....