तू पारिजात..
स्वतःच्या वेळेनं उमलणारी,
स्वतःच्या इच्छेनं गळणारी,
आणि मी?
मी तो वेडा, तुझं गळून पडणं थांबवू पाहणारा...
तू म्हणायचीस, "मी फक्त रात्रीच फुलते."
मी म्हणायचो, "मी पहाटेपर्यंत जागा असतो."
तू खाली यायचीस, हळूच ओंजळीत पडायचीस,
आणि मी वेड्यासारखा तुला धरून ठेवायचो…
पण तुला माहीत होतं ना?
तुझा गंध हवे सोबत जातो,
मी कितीही हात बंद ठेवले,
तरी तो माझ्या मुठीतुन विरतो…
एक दिवस,
तू पुन्हा गळून पडलीस,
मी तुला उचलायला गेलो,
आणि तुझा सुगंध आधीच उडून गेलेला होता…
तेव्हा कळलं,
तू माझी होतीस,
पण क्षणभरासाठीच…
आणि मी?
मी तुझ्या गंधाच्या आठवणीत जन्मभर अडकलेलो...!

Comments
Post a Comment